तू रोज आपल्या सहस्त्ररश्मींनी
या विश्वातला अंधार दुर करतो
नव्या अपेक्षांची, आकांक्षांची
पुलकीत पहाट आपल्या कुशीत आणतो
कुठल्याही स्वार्थाशिवाय, अभिनिवेषाशिवाय...
तोच भास्कर संध्याकाळी थकून भागून
सागराच्या उदरात विसाव्यासाठी जातो
पण खरचं तो विसावा घेतो?
नाही खचितचं नाही
तो सारी शक्ती पुन्हा एकवटत असतो
नव्या पहाटेला, आकांक्षांना बळ देण्याकरता
कुठल्याही 'अहंगंडा'शिवाय
दुसरयांकरता आनंदाने, निरपेक्षपणे तो जगतो...
आणि तेवढ्याच तत्परतेने, मेघ दाटले कि
इतरांच्या चुकांची झालरही तो आपल्या अंगावर घेतो
ग्रहणाच्या वेळीही याचा स्वभावधर्म बदलत नाही
पूर्ण झाकोळून जायच्या आधी हिरयासारखा चमकल्याशिवाय राहत नाही..
कारण तो ही जाणत असतो, हे ग्रहण क्षणिक आहे
पून्हा त्याला आसमंत दिपवून टाकायचाय
क्षणापूर्वी पसरलेल्या भयंकर काळोखाचा लवलेषही न बाळगता.....
No comments:
Post a Comment